सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणंद : प्रतिनिधी
गावच्या हद्दीत पालखी महामार्ग बायपासजवळ फलटण-लोणंद रस्त्यावर स्कॉर्पिओ कारने अचानक उजवीकडे वळून एसटी बससमोर आल्याने झालेल्या अपघातात दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्या. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. सौरव प्रकाश मारकड (वय २२, रा. न्हावी, ता. इंदापूर, जि. पुणे) हा स्कॉर्पिओ (क्र. एमएच-०४-ईएक्स-२००२) चालवत होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने अचानक उजवीकडे वळण घेत कार एसटी बसच्या सुमारे १५ फूट पुढे थांबवली. त्यामुळे एसटी बस (क्र. एमएच-०६-बीडब्ल्यू-११०६) कारवर धडकली.
या अपघातात एसटी बसमधील मंगल तुळशीराम धोत्रे (वय ५०) आणि जया दिलीप माने (वय ६०), दोघीही रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा, या किरकोळ जखमी झाल्या. तसेच स्कॉर्पिओ आणि एसटी बसचे नुकसान झाले.
याप्रकरणी एसटी चालक संदिप उद्धव काकडे (वय ३६, सध्या रा. स्वारगेट आगार, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सौरव मारकड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणंद पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीच्या अटकेची तजवीज करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार वाघ करीत आहेत.
