सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणंद : प्रतिनिधी
मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तसेच घरातील व शेतातील कामे करता येत नसल्याचे टोमणे मारून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोऱ्हाळे (ता. फलटण) येथे घडली. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
शुभांगी अमित शिंदे (वय ३२, रा. कोऱ्हाळे, ता. फलटण) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत स्वप्नील संपत यादव (वय २७, सध्या रा. घाटकोपर, मुंबई; मूळ रा. शहापूर, ता. कोरेगाव) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित विश्वास शिंदे (पती), उषा विश्वास शिंदे (सासू), तेजस विश्वास शिंदे (दीर), राणी रोहिदास नलवडे (नणंद) आणि अक्षदा तेजस शिंदे (जाऊ), सर्व रा. कोऱ्हाळे, ता. फलटण, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१९ पासून २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतच्या कालावधीत शुभांगी यांचा आरोपींकडून कथितरीत्या शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ‘तुला मुलगा होत नाही’, तसेच ‘तुला घरातील स्वयंपाक आणि शेतातील कामे करता येत नाहीत’, असे म्हणून त्यांना वेळोवेळी उपाशी ठेवून जाचहाट केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या छळाला कंटाळून शुभांगी यांनी राहत्या घरातील बेडरूमच्या छताला असलेल्या सिलींगला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ३(५) तसेच भादंवि कलम ३०६, ४९८(अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हेगडे तपास करीत आहेत.
