मुंबई l २४ वर्षांपासून विनाअनुदानित आयटी शिक्षकांचा आक्रोश; विविध मागण्यांसाठी १ सप्टेंबरला मुंबईत आंदोलन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) विषय शिक्षक संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील आय.टी. विषयाच्या शिक्षकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या २४ वर्षांपासून विनाअनुदानित आय.टी. शिक्षक कार्यरत असूनही त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अनुदान, पदमान्यता आणि सेवा संरक्षणासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये आय.टी. विषयाला अनुदान देऊन शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी द्यावी, मान्यताप्राप्त पदांना शासनमान्यता द्यावी, नियुक्ती दिनांकापासून सेवा ग्राह्य धरून सेवा व वेतन संरक्षण द्यावे, स्वयंअर्थसहाय्यित धोरण रद्द करावे तसेच प्रात्यक्षिक तुकडीसाठी पूर्वीप्रमाणे २० विद्यार्थी संख्या ग्राह्य धरावी, यांचा समावेश आहे.
आय.टी. शिक्षकांच्या निष्ठेचा सन्मान करून शासनाने सकारात्मक व ऐतिहासिक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रा. अतुल पाटील यांनी केली आहे.
आंदोलनाचे स्थळ : आझाद मैदान, मुंबई
वेळ : सकाळी ११ वाजता
दिनांक : १ सप्टेंबर २०२६, मंगळवार
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संचमान्यतेसंदर्भातील निकषांवर यापूर्वीही शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदवत आंदोलने केली आहेत.
To Top