सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पणदरे येथे घरातील झोपण्याच्या खोलीत ३० वर्षीय विवाहित महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १२) रात्री उघडकीस आली. वैशाली तानाजी पवार (वय ३०, रा. पणदरे, ता. बारामती) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माळेगाव पोलीस ठाण्यात रंजना लक्ष्मण पवार (वय ५०, रा. खडकआळी, पणदरे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्यापूर्वी वैशाली पवार या त्यांच्या राहत्या घरातील झोपण्याच्या खोलीत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर अज्ञात हत्याराने मारहाण केली. त्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी रात्री ९.३० वाजल्यापासून पहाटे २.५० वाजेपर्यंत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करीत आहेत. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.
