Indapur Accident l दुर्दैवी!...आई-वडिलांनंतर दोन वर्षांत २५ वर्षीय साहिलचा अपघाती मृत्यू; भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
​भिगवण : प्रतिनिधी
बारामती-भिगवण राज्य मार्गावरील शेटफळ गडे गावच्या हद्दीत, कोठारी फार्मजवळ रविवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास बुलेट आणि चारचाकी वाहनादरम्यान भीषण अपघात झाला. या दुर्देवी अपघातात बुलेटस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

​साहिल प्रवीण भोसले (वय २५, रा. उद्धट) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, साहिल भोसले हा आपल्या ताब्यातील बुलेट गाडीवरून (क्रमांक MH 42 BT 0007) बारामतीहून भिगवणच्या दिशेने जात होता. कोठारी फार्म येथील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्याच्या बुलेटला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, साहिल गंभीर जखमी झाला.
​अपघाताची माहिती मिळताच 'आपुलकीची जागा रुग्णवाहिका सेवा'चे संचालक केतन वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी साहिल याला उपचारासाठी भिगवण येथील 'लाईफ लाईन आय.सी.यू.' रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
​घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

मृत साहिल याच्या आई-वडिलांचाही अवघ्या दोन वर्षांपूर्वी पूर्वी दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. दोन वर्षाच्या काळात कुटुंबातील आधार असलेला तरुण मुलगाही अपघातात दगावल्याने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने उद्धट, घोलपवाडी, पवारवाडी व भिगवण परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे.
​अपघाताची खबर सौरभ प्रदीप भोसले यांनी दिली.
अपघाताचा तपास पोलीस हवालदार नानासाहेब सूर्यवंशी करीत आहेत.
To Top