सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील गणेश मार्केट येथील पारंपरिक गुरुवारचा शेतकरी आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करून बाजार पूर्ववत सुरू ठेवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह कदम यांनी बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गणेश मार्केट येथील गुरुवारचा आठवडे बाजार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून बारामती व परिसरातील शेतकरी येथे भाजीपाला, फळे तसेच विविध शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध होते. मात्र, नगरपरिषदेने ठराव क्र. ६२, दिनांक १२ जून २०२६ अन्वये बाजार बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध केला आहे. वाहतूक, अतिक्रमण किंवा स्वच्छतेच्या समस्या असतील तर त्यावर योग्य नियमन व पर्यायी व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी वर्षानुवर्षे सुरू असलेला शेतकरी बाजार बंद करणे अन्यायकारक असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.
“ज्या बाजारामध्ये देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी भाजीपाला विकला होता आणि त्याच बाजारातील बाजारकऱ्यांनी पवार यांचा प्रचार केला होता, तीच बाजारपेठ आता तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाला आहात का?” असा सवालही निवेदनातून करण्यात आला आहे.
कदम यांनी बाजार बंद करण्याचा ठराव तात्काळ स्थगित करून रद्द करावा, बाजार पूर्ववत सुरू ठेवावा तसेच वाहतूक व स्वच्छतेचे योग्य नियमन करावे, अशी मागणी केली आहे. बाजार स्थलांतराचा प्रस्ताव असल्यास प्रथम शेतकरी व विक्रेत्यांना विश्वासात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी आणि योग्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अमरसिंह कदम यांनी दिला आहे.
