सोमेश्वर रिपोर्टर टीम----
माळेगाव : प्रतिनिधी
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग, माळेगाव बुद्रुक येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने अभियंता दिनानिमित्त ‘CIVIL X 2026’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता, कौशल्य तसेच अभियांत्रिकीविषयक समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ९८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमांतर्गत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ‘पोस्टर स्पर्धा’, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ‘कॅन्डर’ तर तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ‘सामान्य ज्ञान’ घेण्यात आले. पोस्टर स्पर्धेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे भविष्य, शाश्वत बांधकाम, स्मार्ट सिटी तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान या विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक व नाविन्यपूर्ण पोस्टर्स सादर केली.
प्रत्येक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय अशी दोन पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी १ हजार रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी ५०० रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्रा. एस. जे. लाड यांना जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. एस. बी. तावरे व प्रा. के. पी. कदम यांना ‘शिक्षक ध्येय’ आयोजित राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केले. प्रास्ताविक स्थापत्य विभागप्रमुख प्रा. एस. एच. परकाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सचिनकुमार कुळथे (संस्थापक-सचिव, संबंधित प्रतिष्ठान) उपस्थित होते. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रमुख करिअर संधी, आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील आव्हानांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘कल्पना करणे – रचना तयार करणे – प्रत्यक्षात मूर्त रूप देणे’ या संकल्पनेतून आयोजित ‘CIVIL X 2026’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या तांत्रिक व सर्जनशील कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळाले. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत बांधकाम, स्मार्ट सिटी आणि AI चा वापर यांसारख्या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास या उपक्रमाची मदत झाली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. एस. एस. बर्गे यांनी आभार मानले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्रा. एस. एस. सुरवसे, प्रा. बी. के. कुलकर्णी, प्रा. एस. एस. बर्गे, प्रा. एस. जे. लाड, प्रा. एस. आर. माळशिकारे, प्रा. वाय. एस. काळे, प्रा. एच. ए. एकलाटे तसेच श्री. कोकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
