सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी व भागशाळा मुरूम येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारी पोयटा मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेत डॉ. विवेक आबनावे, मरिअन्ना आबनावे, युगंधरा आबनावे व निर्मलअनुराग आबनावे यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे मरिअन्ना आबनावे या मूळच्या रशियन असून त्यांनी भारतीय संस्कृतीनुसार सुंदर गणेशमूर्ती साकारत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्वतःच्या हाताने मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे जलस्रोत व पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी मातीच्या मूर्तींचा वापर करावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक मानसिंग जाधव, पर्यवेक्षक हनुमंत खरात, शिक्षक स्नेहल सोरटे, शितल सस्ते, स्वाती टेंगले, मोहिनी शितोळे, स्नेहल जाधव, संध्या येवले, प्रमिला निंबाळकर, विनोद भोईटे, सुरज कोरडे तसेच सेवक कर्मचारी बाळासाहेब चव्हाण यांनी सहकार्य केले.
पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.
