सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
पुणे जिल्हा परिषद 'ग्लोबल गुरुजी' उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ससेवाडी ता. भोर येथील शिक्षिका सुवर्णा मारुती कापरे यांची ग्लोबल टीचर म्हणून शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमता व कौशल्य विकासासाठी सिंगापूर येथील अभ्यास दौन्यासाठी निवड झाली. सिंगापूर मधील आधुनिक शिक्षण पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली.
कायमच शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षिका म्हणून सुवर्णा कापरे यांची तालुक्यात ओळख आहे. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी शाळेत कोडींग, परकीय भाषा, इको क्लब, विविध अध्यापन पद्धतीचा वापर, मनोरंजक खेळ,खेळातून शिक्षण यासारख्या विविध उपक्रमांचा अवलंब करतात, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जागतिक यशाची दिशा देण्यासाठी त्या सतत कार्यरत असतात.जिल्हा परिषद पुणे,अमेझॉन फ्युचर व लाईफ टीम यांच्या संयुक्त विद्यमाने कोडिंग प्रशिक्षण उपक्रमात कापरे यांनी सलग तीन वर्ष टॉप टीचर म्हणून यश मिळवले आहे.
तसेच शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेअंतर्गत परकीय भाषा फ्रेंच स्पर्धेत पुणे विभाग स्तर पर्यंत यश संपादन केले आहे. 'ग्लोबल टीचर' निवड या गौरवाच्या क्षणी गटशिक्षणाधिकारी सुजाता देशमाने,केंद्रप्रमुख विजय कारभळ,शिक्षक संघांचे नेते पोपट निगडे, सविता तनपुरे, मारुती कापरे, महेंद्र सावंत, सुदाम ओंबळे, पंडित गोळे, अनंत आंबवले, विठ्ठल दानवले, भानुदास खुटवड, विकास खुटवड, हनुमंत चव्हाण, प्रदीप बदक , बापू जेधे, संपत मळेकर तसेच ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती ससेवाडी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
