सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर- महाड मार्गावरील वरंधा घाटातून अनेक दिवस बंद झालेली एसटी बससेवा गणेशोत्सवापूर्वी पूर्ववत करण्याची मागणी हिरडस मावळ खोऱ्यातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाने घाट वाहतुकीस योग्य असल्याचे स्पष्ट करणारे पत्र महाड आगाराला दिल्याने भोर आगारातून एसटी बस सेवा लवकरच सुरू होईल अशी आशा ग्रामस्थांना लागून राहिली आहे.
मागील तीन महिन्यांपासून भोर- महाड मार्गावरील वरंधा घाटातून हिर्डोशी ता.भोर पासून पुढे महाड पर्यंत एसटी बससेवा बंद असल्याने कारूंगण, वारवंड, शिरगाव, आशिंपी, उंबर्डे, उंबर्डेवाडी, शिलिंब, कुंड, दुर्गाडी, अभेपुरी, राजीवडी तसेच महाडला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.वरंधा घाट परिसरातील रस्त्याच्या काही भागात पावसाळ्यात भूस्खलन तसेच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतुकीवर परिणाम होत होता.त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. महामार्ग विभागाने केलेल्या पाहणीनंतर सद्यस्थितीत मार्ग वाहतुकीस योग्य असल्याचे स्पष्ट केले असल्याचे महाड विभागातील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. तर महाड आगाराकडून या मार्गावरील एसटी सेवा पूर्ववत करण्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू असल्याचेही सांगितले. राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्ता सुस्थितीत असल्याचे पत्र भोर आगाराला दिल्यास रस्त्याची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे भोर आगार व्यवस्थापकांनी सांगितले
एसटी बंदने नागरिकांची गैरसोय
वरंधा ता.भोर घाटातील शिरगाव पासून पुढील एसटी बस मागील तीन महिन्यापासून बंद असल्याने प्रवाशांची दळणवळणाची गैरसोय झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.या मार्गावरील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय थांबवण्यासाठी प्रशासनाने गणेशउत्सवापूर्वी भोर आगारातून एसटी बस सुरू करावी असे शिरगाव ता. भोर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मारुती पोळ यांनी सांगितले.
