बारामती l ‘सोमेश्वर’ची पुन्हा राष्ट्रीय भरारी; दुसऱ्यांदा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार

सोमेश्वर रिपोर्टर live

लोकमत न्युज नेटवर्क, 
सोमेश्वरनगर ; दि. ११
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ गळीत हंगामात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर मानाचा तुरा रोवला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ लिमिटेडकडून कारखान्याला ‘उच्च रिकव्हरी क्षेत्रातील तांत्रिक कार्यक्षमतेसाठी तृतीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

कारखान्याने सादर केलेल्या माहितीचे मूल्यांकन केल्यानंतर मुख्य साखर संचालक, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ पुरस्कार निवड समितीने कार्यक्षमता पुरस्कार २०२४-२५ चे निकाल अंतिम केले. आव्हानात्मक परिस्थितीतही सोमेश्वर कारखान्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
राष्ट्रीय पातळीवरील या पुरस्कारामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तांत्रिक कार्यक्षमतेवर आणि २०२४-२५ मधील कामगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास संपूर्ण संचालक मंडळाने उपस्थित राहून हा गौरव स्वीकारावा, असे महासंघाने कारखाना प्रशासनाला कळविले आहे.
सोमेश्वर कारखान्याला मिळालेल्या या पुरस्कारामुळे कारखाना सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
To Top