बारामती | टी.सी. कॉलेजसमोर वाहतूक शाखेची अचानक नाकाबंदी; ७८ वाहनचालकांवर कारवाई, ५९ हजारांचा दंड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळावे, छेडछाडीच्या प्रकारांना आळा बसावा तसेच बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी बारामती वाहतूक शाखेने टी. सी. कॉलेज परिसरात अचानक नाकाबंदी करून धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ७८ वाहतूक नियमभंग प्रकरणांमध्ये ५९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहन चालविल्याच्या १३ स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या.
मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली टी.सी. कॉलेजच्या गेटसमोर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत नाकाबंदी करण्यात आली. यावेळी वाहतूक शाखेचे १९ पोलीस अंमलदार आणि एक आर.सी.पी. पथक सहभागी झाले होते. बारामती शहर पोलिसांचीही या कारवाईस मदत झाली. नाकाबंदी दरम्यान नो पार्किंग, ट्रिपल सीट, विनापरवाना वाहन चालविणे, परवाना जवळ न बाळगणे, नंबर प्लेटमध्ये बदल किंवा तुटलेली नंबर प्लेट, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, काळी काच, एच.एस.आर.पी. नसणे, वाहनात अनधिकृत बदल यांसह विविध नियमभंगांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये नो पार्किंगच्या ३ प्रकरणांत २,५००, ट्रिपल सीटच्या १ प्रकरणात १,०००, लायसन्स नसल्याच्या २ प्रकरणांत १०,०००, लायसन्स जवळ न बाळगल्याच्या ३६ प्रकरणांत २०,०००, नंबर प्लेट ब्रोकनच्या २१ प्रकरणांत १३,०००, मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याच्या १ प्रकरणात १,००० आणि काळ्या काचेच्या ३ प्रकरणांत ३,५०० दंड करण्यात आला.

याशिवाय पोलीस इशारा, विनाएच.एस.आर.पी., वाहनात बदल तसेच इतर नियमभंगांच्या प्रकरणांवरही कारवाई करण्यात आली. नो एन्ट्री, सीटबेल्ट, हेल्मेट, इन्शुरन्स, रेड रिफ्लेक्टर, अवैध प्रवासी वाहतूक तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८५ संदर्भातील नियमांचेही पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. अल्पवयीनांच्या हाती वाहन देऊ नका कारवाईदरम्यान अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहन चालविले जात असल्याचे आढळून आल्याने १३ स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या.

 अल्पवयीनांच्या हातात वाहन देणे त्यांच्या तसेच इतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य महाविद्यालय सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत विनाकारण वाहने फिरविणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, छेडछाडीला कारणीभूत ठरणारे वर्तन करणे, मोठ्या आवाजात अथवा बेदरकारपणे वाहन चालविणे, ट्रिपल सीट जाणे किंवा कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर वाहतुकीला अडथळा निर्माण करणे अशा प्रकारांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

“महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला सुरक्षित वाटले पाहिजे आणि नियम पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना अथवा नागरिकांना बेदरकार वाहनचालकांमुळे त्रास होता कामा नये,” या भूमिकेतून महाविद्यालयीन परिसरात अशा अचानक नाकाबंदी मोहिमा यापुढेही राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

शाळा-महाविद्यालये, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरात कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कारवाई करण्यात येणार असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार सक्त कारवाई केली जाणार आहे.
“नियम पाळणाऱ्यांना संरक्षण; बेदरकार वाहनचालकांवर कायद्याची सक्त कारवाई,” असा इशारा बारामती वाहतूक शाखेने दिला आहे.
To Top