सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : प्रतिनिधी
केसुर्डी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत
पुणे-सातारा सर्व्हिस रोडवर कारवर 'महाराष्ट्र विधानसभा सदस्य' असा लोगो लावून फिरणाऱ्या तरुणावर शिरवळ पोलिसांनी कारवाई केली. संबंधित कार जप्त करण्यात आली असून, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या ३५ वर्षीय तरुणाविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल राजेंद्र यादव (वय ३५, रा. केदारेश्वर नंदनवन अपार्टमेंट, शिरवळ, ता. खंडाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
केसुर्डी गावच्या हद्दीत पुणे-सातारा जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर एमएच-०९-डीजे-६६८८ क्रमांकाची कार पोलिसांच्या निदर्शनास आली. या कारच्या पुढील तसेच मागील बाजूस वर्तुळाकार हिरव्या रंगाचा लोगो लावण्यात आला होता. त्यावर पांढऱ्या रंगात 'महाराष्ट्र विधानसभा सदस्य' असा उल्लेख असून, त्याखाली अशोकस्तंभ व 'आमदार' असा मजकूर असलेला लोगो लावण्यात आला होता.
पोलिसांनी कारचालक विशाल यादव याच्याकडे चौकशी केली असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. तसेच स्वतः किंवा कुटुंबातील कोणीही महाराष्ट्र विधानसभा सदस्य नसताना आमदार असल्याचा भास निर्माण करणारा लोगो कारवर लावल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
यानंतर शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशाल यादव याला कारसह ताब्यात घेतले. संबंधित कार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अरविंद बाहऱ्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल यादव याच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शिवाजी जाधव पुढील तपास करीत आहेत.
----------------
भामटेगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार : महेश इंगळे----
शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भामटेगिरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे. नागरिकांनी कायदेशीर नियमांचे पालन करून वावरणे आवश्यक आहे. नियमांचा भंग करणाऱ्या तसेच भामटेगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी दिला आहे.
