सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कराड : प्रतिनिधी
घरासमोरील रस्त्याच्या कारणावरून हेळगाव (ता. कराड) येथे रविवारी सकाळी सूर्यवंशी कुटुंबीयांमध्ये सशस्त्र धुमश्चक्री झाली. कुर्हाड, कोयता, लोखंडी टोचा, दांडके आणि दगडांनी झालेल्या हल्ल्यात सूरज भरत सूर्यवंशी (वय २८) याचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य पाच जण जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी प्रज्वल सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून मसूर पोलिस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमंत ऊर्फ उत्तम रामचंद्र सूर्यवंशी, आयुष सचिन ऊर्फ विठ्ठल सूर्यवंशी, ओंकार उत्तम सूर्यवंशी, सचिन ऊर्फ विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी, रामचंद्र महादेव सूर्यवंशी, रेश्मा सचिन ऊर्फ विठ्ठल सूर्यवंशी, सुनिता उत्तम सूर्यवंशी, तेजस्विनी संजय सूर्यवंशी, शालन रामचंद्र सूर्यवंशी आणि विद्या ओंकार सूर्यवंशी (सर्व रा. हेळगाव) यांचा त्यामध्ये समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेळगाव येथील प्रज्वल किसन सूर्यवंशी यांच्या घरासमोरील रस्त्यावरून सूर्यवंशी कुटुंबीयांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू होता. याच वादातून रविवारी सकाळी हा प्रकार घडला.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, श्रीमंत ऊर्फ उत्तम रामचंद्र सूर्यवंशी हा कुर्हाड, आयुष सचिन ऊर्फ विठ्ठल सूर्यवंशी हा लोखंडी टोचा, ओंकार उत्तम सूर्यवंशी हा कोयता, तर सचिन ऊर्फ विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी आणि रामचंद्र महादेव सूर्यवंशी हे लाकडी दांडके घेऊन आले होते. त्यांच्यासह अन्य व्यक्तींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, सूरज सूर्यवंशी हा घराशेजारील बाथरूममधून घरात जात असताना त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार पाहून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवरही कुर्हाड, कोयता, दांडके आणि दगडांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.
या घटनेत प्रज्वल किसन सूर्यवंशी, सौरभ भरत सूर्यवंशी, यश शशिकांत सूर्यवंशी, रेखा शशिकांत सूर्यवंशी आणि रोहिणी भरत सूर्यवंशी हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूचेही दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
परस्परविरोधी फिर्यादीची शक्यता
या घटनेप्रकरणी ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांनीही पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्यामुळे रविवारी सकाळी नेमके काय घडले, वाद अचानक का उफाळून आला आणि हल्ल्याला सुरुवात नेमकी कोणी केली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. चौकशीनंतर घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
