Pune Breaking I देहूगावात कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; आयटी इंजिनियर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
देहूगाव  कौटुंबिक वादातून आयटी इंजिनियरने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना देहूगाव येथे रविवारी (दि. २० सप्टेंबर) सकाळी पावणेसहाच्या सुमारास उघडकीस आली. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे.

मृत महिलेचे नाव शुभांगी आकाश बारस्कर (वय २८, रा. देहूगाव, ता. हवेली) असे आहे. तर तिचा पती आकाश रामदास बारस्कर (वय २६) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना ओमकार सोसायटी परिसरात एकाला मारहाण झाल्याची माहिती मिळाली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आकाश हा रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला. तर सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत शुभांगी गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळली.

पोलिसांनी दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शुभांगी यांना मृत घोषित केले. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आकाशवर सध्या उपचार सुरू आहेत.

वर्षभरापासून सुरू होता वाद

आकाश हा आयटी इंजिनियर असून हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत नोकरीला आहे. तर शुभांगी एका खासगी कंपनीत काम करत होत्या. दोघांचा डिसेंबर २०२३ मध्ये विवाह झाला होता. मागील चार ते पाच महिन्यांपासून ते देहूगावातील ओमकार सोसायटीत भाड्याने राहत होते.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून कौटुंबिक वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. याच वादातून आकाशने शुभांगी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आकाशने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेचा पुढील तपास देहूरोड पोलिस करत असून, पतीने पत्नीची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली, याबाबत तपास सुरू आहे.
Tags
To Top