सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
चाकण : प्रतिनिधी
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा मार्ग बदलल्यानंतरही अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने तब्बल सहा तास पाठलाग करून ट्रक पकडला. चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडवून तपासणी केली असता त्यामध्ये पानमसाला, सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध चाकण उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. १८) दुपारी दोन वाजता कारवाईला सुरुवात करण्यात आली. मध्य प्रदेशातून समृद्धी महामार्गाने भिवंडी-ठाण्याच्या दिशेने येणारा ट्रक अचानक मार्ग बदलून संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
ट्रकने मार्ग बदलल्याचे लक्षात आल्यानंतर ठाणे विभागाचे पथक मुरबाडच्या दिशेने, तर पुणे विभागाचे पथक राजगुरुनगर येथे तैनात करण्यात आले. राजगुरुनगर टोलनाक्यावर अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने ट्रक न थांबविता भरधाव वेगाने पुढे नेला.
त्यानंतर सावळे यांनी ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन अखेर चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडविण्यात आला. रात्री सुमारे आठ वाजता ट्रक ताब्यात घेण्यात आला.
रजनीगंधा, आरएमडीसह विविध पानमसाला जप्त
ट्रकची तपासणी केली असता २९ लाख ९५ हजार २०० रुपयांचा रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला, २४ लाख ९४ हजार ८०० रुपयांचा तानसेन सुगंधित पानमसाला, २६ लाख ४० हजार रुपयांचा आर.एम.डी. पानमसाला, ९ लाख ६० हजार रुपयांचा तुळशी रॉयल जाफरानी जर्दा आणि २ लाख ६४ हजार ६०० रुपयांचा टी.ओ. प्रिमियम जर्दा आढळून आला.
याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला एमएच १८ बीझेड २३५० क्रमांकाचा ट्रक, किंमत २० लाख रुपये, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपये आहे.
जप्तीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रे, पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया रात्रभर सुरू होती. शनिवारी (दि. १९) सकाळी दहा वाजता अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
पाच जणांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी ट्रकचालक नफीस मेहबूब खान (वय ४०, रा. हरियाणा), पुरवठादार निलेश राठी (रा. खामगाव, बुलढाणा), अरुण पाटील (रा. जळगाव), धुळे येथील वाहनमालक मे. जे.एम.डी. एंटरप्रायझेस आणि इंदूर येथील वाहतूकदार संजय माटा या पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचे पूर्वगुन्हे, प्रतिबंधित पदार्थाची पुरवठा साखळी आणि आर्थिक व्यवहार तपासण्यात यावेत, तसेच दोष आढळल्यास संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांकडे केली आहे.
