सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पिसोळी परिसरात भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी ट्रॅक्टर चालकासह मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
वर्षा अजय जगदेव (वय ८, सध्या रा. मासाळ चाळीजवळ, पिसोळी, कात्रज-कोंढवा रस्ता) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील अजय संजय जगदेव (वय २७) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय जगदेव आणि त्यांचे कुटुंबीय मूळचे गुजरातमधील सूरत येथील रहिवासी असून, अजय हे मजुरीचे काम करतात. १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास वर्षा ही पिसोळीतील होले वस्ती परिसरातून जात होती. त्यावेळी भरधाव वेगातील ट्रॅक्टरने तिला धडक दिली. या धडकेत ती ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू करून ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता, त्याच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे समोर आले. तसेच, चालक गणेश शंकर दिवटे (रा. सद्गुरु बिल्डिंग, पिसोळी) याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक गणेश दिवटे तसेच ट्रॅक्टर मालक भाऊसाहेब बाजीराव मासाळ (वय ४७, रा. मयूरी ऑप्टिमम सोसायटी, पिसोळी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार रासकर करीत आहेत.
