सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : प्रतिनिधी
धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील एमआयडीसी परिसरातील एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या स्वयंपाकगृहात पीएनजी गॅस पाईपलाईनमधून गळती होऊन मोठा स्फोट झाला. या स्फोटात स्वयंपाकगृहाची इमारत कोसळली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शनिवार (दि. १२ सप्टेंबर) रोजी कंपनीला सुट्टी असल्याने कंपनी परिसरात सुरक्षारक्षक वगळता कर्मचारी उपस्थित नव्हते. रात्रीच्या सुमारास स्वयंपाकगृहाला गॅस पुरवठा करणारी पीएनजी पाईपलाईन सुरू असल्याने गॅस गळती होऊन स्वयंपाकगृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गॅस साचला. त्यानंतर अचानक स्फोट झाल्याने स्वयंपाकगृहाची इमारत कोसळली.
स्फोटाचा आवाज ऐकून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एशियन पेंट्ससह इतर ठिकाणच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले.
दरम्यान, कंपनी प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या दुर्घटनेत स्वयंपाकगृहाच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांची वित्तहानी झाल्याचे सांगण्यात आले. घटनेची नोंद करण्याचे काम शिरवळ पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होते.
