सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
मोरगाव ( ता. बारामती ) येथील श्री मोरया पेट्रोलियम पेट्रोल पंपावर दारूच्या नशेत गोंधळ घालत पेट्रोल पंप कर्मचाऱ्यास मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या बलेनो कारसह लोखंडी कोयता असा एकूण ५ लाख १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही घटना सोमवार ( दि. १४ ) रात्री सुमारे ११.४० वाजता घडली.
या प्रकरणी अभिनव भरत भामे (वय १९), रणजित रविंद्र भामे (वय २६) व केदार संजय भामे (वय २१), तिघेही रा. मावडी कडेपठार, ता. पुरंदर, जि. पुणे, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, भारतीय शस्त्र कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात भरत रंगनाथ मुरूकुटे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार आरोपी सीएनजी भरत असताना सिगारेट ओढत होते. त्यांना सिगारेट ओढू नये, असे सांगितल्याच्या कारणावरून आरोपींनी मुरूकुटे यांना मारहाण व दमदाटी केली. तसेच आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केला.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या एमएच १२ डब्ल्यूयू २६०८ क्रमांकाच्या बलेनो कारची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना लोखंडी कोयता आढळून आला. पोलिसांनी कार व कोयता असा एकूण ५ लाख १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार लोंढे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग व उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत शेळके, पोलीस उपनिरीक्षक ताकवणे तसेच पोलीस अंमलदार किसन ताडगे, तुषार जैनक, महादेव साळुंखे, भाऊ चौधरी व निहाल वनवे यांनी केली.
.........................
