बारामती l गणेश विसर्जन मिरवणुकीत नियमांचा भंग; महिला नृत्यांगणांसह ७ जणांवर गुन्हा

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करत डॉल्बीच्या तालावर अश्लील हावभाव, अंगविक्षेप व बिभत्स नृत्य केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २३ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास कोहाळे बुद्रुक येथील मतकर वस्ती, माळशिकारेवाडी परिसरात करण्यात आली.
श्री साई समर्थ तरुण मंडळ, माळशिकारेवाडी, कोऱ्हाळे बुद्रुक यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टर (एमएच ४२ क्यू २६४४) व त्यास जोडलेल्या चारचाकी ट्रॉली (एमएच ४२ बीएस २१२०) मध्ये डॉल्बी संगीत सुरू होते. यावेळी महिला नृत्यांगणांकडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव, अंगविक्षेप व बिभत्स नृत्य केले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
तसेच या प्रकाराला मंडळाचे पदाधिकारी व संबंधित व्यक्तींकडून प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या अध्यक्षांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटीस देऊन विविध सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.
या प्रकरणी राधा संग्राम घुले (वय २९), मिनाक्षी बापुराव रुपनवर (वय ३५), काजल नितीन शिंदे (वय २६, तिघी रा. लाकडी, ता. इंदापूर), रोहित हणमंत धुमाळ (रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा, डॉल्बी मालक), तसेच राहुल दिलीप माळशिकारे, दिपक सुभाष माळशिकारे व निखील जालिंदर माळशिकारे (तिघे रा. माळशिकारेवाडी, कोहाळे बुद्रुक) यांच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुलाणी करीत आहेत.
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शासन तसेच पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
To Top