बारामती l चेक न वटल्याप्रकरणी आरोपीस तीन महिने कारावास; ८८.५९ लाखांच्या चेकप्रकरणी ९७ लाखांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
चेक न वटल्याप्रकरणी दाखल फौजदारी खटल्यात पुणे येथील मे. सिव्हिल जज्ज, वरिष्ठ स्तर व प्रमुख न्यायदंडाधिकारी आनंद एस. मुंढे यांनी आरोपीस तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, फिर्यादीस ९७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. हा आदेश २१ सप्टेंबर २०२६ रोजी देण्यात आला.

स्पंदन मेडिकेअरचे प्रोप्रायटर जगदीश बाजीराव कदम (रा. समर्थनगर, नवी सांगवी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. युनायटेड मेडिकल सोल्यूशन कंपनीतर्फे जयदीप दत्ताराम कुंभार (रा. वारजे, पुणे) यांनी ही खासगी तक्रार दाखल केली होती.

फिर्यादीची वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक मशिनरी पुरविणारी फर्म आहे. आरोपीने वेळोवेळी फिर्यादीकडून मशिनरी घेतली होती. या व्यवहारातील थकीत रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने फिर्यादीस ८८ लाख ५९ हजार ९०३ रुपयांचा चेक दिला होता. मात्र, बँकेत जमा केल्यानंतर तो चेक न वटता परत आला.

त्यानंतर फिर्यादीने अॅड. विशाल विजयकुमार बर्गे व अॅड. युवराज जाधव (रा. बारामती) यांच्यामार्फत न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला.

आरोपीने आपल्याकडील रक्कम यापूर्वीच परत केल्याचा, तसेच पैसे उकळण्याच्या उद्देशाने खोटा खटला दाखल केल्याचा बचाव घेतला. त्यावर फिर्यादीतर्फे अॅड. विशाल बर्गे यांनी युक्तिवाद केला. चेकचा गैरवापर होण्याची भीती असल्यास आरोपीने पोलिसांत तक्रार करणे किंवा बँकेस चेकचे ‘स्टॉप पेमेंट’ करण्याच्या सूचना देणे अपेक्षित होते; मात्र, तसे झाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. तसेच, वकिलांच्या नोटिशीलाही तत्काळ उत्तर देऊन आपली बाजू मांडण्यात आली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीने चेकवरील स्वाक्षरी नाकारली नसल्याचाही मुद्दा त्यांनी मांडला.

या युक्तिवादाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल न्यायालयासमोर सादर करण्यात आले. फिर्यादीतर्फे अॅड. विशाल बर्गे व अॅड. युवराज जाधव यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, ९७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.
To Top