सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : पंढरीनाथ शिंदे
बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, ऋषी विज्ञान केंद्र बारामती, महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोळविहिरे येथे रब्बी पूर्व पीक नियोजन अभियान कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. यावेळी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक नियोजन व आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.
कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे पीक पद्धती व पीक व्यवस्थापनात आवश्यक बदल करणे काळाची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. रब्बी कांदा व्यवस्थापन व साठवणूक, कांदा बीजोत्पादन, मुक्तसंचार गोठा, मुरघास तंत्रज्ञान, काटेकोर ऊस उत्पादन, कोरडवाहू भागातील पीक व्यवस्थापन, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत फवारणीद्वारे खत देणे, शेतकरी गटांची स्थापना तसेच जलसंधारण व भाजीपाला लागवड याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली.
कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मृदाशास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी रब्बी कांदा उत्पादन, खत व्यवस्थापन, लागवड पद्धती, साठवणूक, रोपवाटिका तसेच ऊस व इतर रब्बी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कोळविहिरे ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या वतीने राजेंद्र पवार यांचा सन्मान करण्यात आला. सहाय्यक कृषी अधिकारी स्नेहलता जाधव, प्रकल्प सहाय्यक ओंकार ढोबळे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
