सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सातारा l प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्याने वाहतुकीस खुल्या करण्यात आलेल्या सहापदरी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. कोल्हापूर येथील आई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन स्कॉर्पिओ गाडीतून गावाकडे परतणाऱ्या चार तरुण मित्रांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कातरखटाव गावातील काही तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूर येथील आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओ गाडीतून गेले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण रात्रीच्या सुमारास आपल्या गावाकडे परतत होते. दरम्यान, रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कराड शहराजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीने एका ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात तेजस देशमुख (वय २५, चालक), सागर निंबाळकर (वय २३), सुयश चिंचकर (वय २०) आणि रोहित धोत्रे (वय २१) यांचा मृत्यू झाला आहे.
तर ऋतुराज दुबळे (वय २१), शंतनू शिंगाडे (वय २०) आणि अमन तांबोळी (वय २३) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्व तरुण खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, संग्राम पाटील, अमृत बाबर, दस्तगीर आगा, राहुल कदम आणि सचिन देवकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात हलवले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या नव्या सहापदरी उड्डाणपुलावर झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



