Baramati Crime l राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात दोघांना अटक; दोन लाख रुपये देऊन हल्ला घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न


सोमेश्वर रिपोर्टर टीम----

बारामती : प्रतिनिधी 

राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर सशस्त्र हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यामध्ये पार्थ वासुदेव अवथळे (वय १९) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यासाठी ज्ञानदेव शिंदे याने दोन लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १० मिनिटांनी पालखी महामार्गावरील पायलट ढाब्यासमोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी फिर्यादी लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पुणे शहर पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह पार्थ वासुदेव अवथळे याला पकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता, ज्ञानदेव महादेव शिंदे याने सदर गुन्हा करण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.


त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी पार्थ वासुदेव अवथळे आणि ज्ञानदेव महादेव शिंदे या दोघांना २० ऑक्टोबर २०२६ रोजी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पुढील तपास बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.

To Top