Baramati Breaking l विहिरीची दरड कोसळून दोन मजुरांचा मृत्यू! देऊळगाव रसाळ येथील दुर्घटना; गाळ काढण्याचे काम सुरू असताना काळाचा घाला

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : मनोहर तावरे
बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथे शेतातील विहिरीचा कडेला असलेला भाग अचानक कोसळल्याने दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मच्छिंद्र रामचंद्र रसाळ (वय ५५) आणि अमोल धनाजी रसाळ (वय ३०) अशी मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत. विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


     मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव रसाळ येथील एका शेतातील विहिरीत गाळ काढण्याचे काम सुरू होते. यावेळी मच्छिंद्र रसाळ आणि अमोल रसाळ हे दोघेही विहिरीत उतरून काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक विहिरीच्या कडेचा भाग कोसळला. त्यामुळे दोघेही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामती येथे पाठविण्यात आले.
पाण्याच्या शोधात जीव गमावल्याने हळहळ
    यंदा पावसाअभावी बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी तसेच विहिरींची पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने गाळ काढण्याची कामे केली जात आहेत.
            मात्र, विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू असताना अचानक दरड कोसळल्याने दोन मजुरांना आपला जीव गमवावा लागला. पाण्याची गरज भागविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांदरम्यानच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
            विहिरीतील गाळ काढताना विहिरीच्या कडेची माती खचण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा कामांदरम्यान आवश्यक सुरक्षितता आणि खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या दुर्घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. दोन कुटुंबांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
                                
To Top