Baramati Crime l सुपारी देऊन खुनाचा कट रचल्याचा आरोप; चार महिन्यांपासून माळेगाव पोलिसांना गुंगारा देणारा सरपंच जेरबंद!

सोमेश्वर रिपोर्टर टीम----

माळेगाव : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील मेदड ग्रामपंचायतीचा सरपंच गणेश दत्तात्रय काशीद याला खुनाचा कट रचल्याच्या प्रकरणात माळेगाव पोलिसांनी अखेर अटक केली आहे. 

               गेल्या चार महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांनी त्याला अटक करण्यात यश मिळवले असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी माळेगाव खुर्द परिसरात खुनाचा कट रचल्याच्या प्रकरणात गणेश काशीद आणि मयूर विष्णू मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान जमिनीच्या व्यवहारातून पैशांची देवाणघेवाण झाल्याचा तसेच चेक आणि रोख रकमेच्या माध्यमातून व्यवहार झाल्याचा उल्लेख समोर आला आहे. याशिवाय, दोन गावठी पिस्तुले दिल्याचा आणि एका अल्पवयीन मुलाला जिवे मारण्याबाबत चर्चा झाल्याचा आरोपही तपासात पुढे आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जमिनीच्या व्यवहारातून मिळालेल्या पैशांपैकी काही रक्कम चेकद्वारे, तर काही रक्कम रोख स्वरूपात देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गणेश काशीद आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात असून, खुनाचा कट रचल्याच्या आरोपाची चौकशी सुरू आहे.

विशेष म्हणजे, गणेश काशीद याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसारख्या गंभीर स्वरूपाचे एकूण १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वारंवार पोलिसांना गुंगारा देत फरार राहणाऱ्या काशीदला अखेर अटक करण्यात आल्याने माळेगाव परिसरात या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे तसेच इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास माळेगाव पोलीस करत आहेत.

To Top