बारामती l ‘जवळ येऊन हात लावला’; महिला रुग्णाचा आरोप, नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल


सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

बारामती : प्रतिनिधी

पोटदुखीच्या त्रासावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेने डॉक्टरांविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. तपासणीच्या वेळी डॉक्टरांनी जवळ येत हात लावल्याचा आणि आपल्याला लज्जा वाटेल असे वर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे. बारामतीतील नामांकित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. राधेय खलाटे यांच्या विरोधात या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला १९ ऑक्टोबर रोजी पोटदुखीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी खलाटे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेली होती. सलाईन लावल्यानंतर ते संपल्यावर डॉक्टरांनी तिला केबिनमध्ये बोलावले. त्यावेळी महिलेचा लहान मुलगा तिच्यासोबत होता. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्यानंतर तिला पाठीच्या व्यायामाच्या हालचाली करण्यास सांगितले. यावेळी डॉक्टर वारंवार आपल्या जवळ येत असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. आपण अंतर ठेवण्यास सांगितल्यानंतरही डॉक्टर पुन्हा जवळ आले. हात मागे ताणण्याची हालचाल करत असताना डॉक्टरांनी कमरेला हात लावून छातीत धडधड होत आहे का, अशी विचारणा केल्याचा आरोपही तिने केला आहे. या प्रकारामुळे अस्वस्थ झाल्याने आपण पुढील व्यायाम करणार नसल्याचे सांगून औषधे देण्याची विनंती केली आणि त्यानंतर घरी परतल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. 



घरी आल्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे मानसिक त्रास होत असल्याचे महिलेने म्हटले आहे. दसऱ्याच्या दिवशी डॉक्टरांनी व्हॉट्सॲपवर शुभेच्छा पाठवल्यानंतर तिने त्यांना संदेश पाठवून त्या दिवशीच्या वर्तनाबाबत जाब विचारला. त्यावर डॉक्टरांनी माफी मागून पुन्हा असे होणार नाही, असा संदेश पाठवल्याचा दावा महिलेने केला आहे. नोकरी निमित्त बाहेर असलेला पती बारामतीला आल्यानंतर तिने त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी राधेय खलाटे यांच्याविरुद्ध भारतीय  गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Tags
To Top