बारामती l वाघळवाडी जमीन व्यवहार प्रकरणात दिलीप खेडकरांच्या अडचणीत वाढ; जमीनीतील भागीदाराची बारामती पोलिसात धाव


सोमेश्वर रिपोर्टर टीम----

 सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

वाघळवाडी येथील १४ गुंठे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून १ कोटी ३२ लाख रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी वरिष्ठ विधी अधिकारी आणि ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. दत्तात्रय त्र्यंबक देवळे यांनी याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. जमिनीच्या मालकी हक्काबाबत फसवणूक, विश्वासघात, मुद्रांक शुल्कातील कथित अनियमितता तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. या तक्रारीत दिलीप कोंडिबा खेडकर यांच्यासह संबंधित व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत. 

तक्रारीनुसार, वाघळवाडी येथील गट क्रमांक ८ मधील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात अॅड. देवकळे यांनी ५० टक्के रक्कम दिली होती. संबंधित जमिनीतील १० गुंठे क्षेत्रावर आपला कायदेशीर मालकी हक्क असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही जमीन मूळ मालक पुरुषोत्तम रामराजे जगताप यांच्याकडून खरेदी करण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, व्यवहारावेळी संबंधित १० गुंठे जमीन त्यांच्या नावावर कायदेशीररीत्या हस्तांतरित करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी ६ ऑगस्ट २०१२ रोजी दुय्यम निबंधक, बारामती यांच्याकडे अपरिवर्तनीय कुलमुखत्यारपत्राची नोंदणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, त्यानंतरही जमीन त्यांच्या नावावर हस्तांतरित झाली नसल्याचा आणि आपल्या संमतीशिवाय संबंधित जमिनीची तिसऱ्या पक्षाला विक्री करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 अॅड. देवकळे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २०१२ पासून पुण्यातील प्रभात रोड परिसरातील निवासस्थानी अनेकदा प्रत्यक्ष भेटी झाल्या. या वेळी संबंधितांनी जमीन त्यांच्या नावावर करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीची वेळ आली की फोन न उचलणे, संपर्क टाळणे आणि वारंवार नवीन आश्वासने देणे असे प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षांत जमीन हस्तांतरणाबाबत वारंवार चर्चा झाली. जमिनीची बाजारभावानुसार रक्कम देण्याचे किंवा जमीन तक्रारदाराच्या नावावर करण्याचे सांगण्यात आले; मात्र या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. संमतीशिवाय जमीन तिसऱ्या पक्षाला विकल्याचा दावा आपल्या नावावर १० गुंठे जमीन हस्तांतरित करण्याचे आश्वासन आणि त्यासंदर्भातील नोंदणीकृत कागदपत्रे असतानाही, आपली पूर्वपरवानगी किंवा संमती न घेता जमिनीची परस्पर विक्री करण्यात आल्याचा आरोप अॅड. देवकळे यांनी केला आहे.

 या व्यवहारामुळे आपले मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत त्यांनी संबंधितांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत देवळे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात दिलीप खेडकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Tags
To Top