सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बावधन : प्रतिनिधी
पुणे-बावधन : इन्स्टाग्रामवर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओवरून झालेल्या वादाचा राग मनात धरून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील विद्यार्थ्याने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बावधन–महाळुंगे–सूस परिसरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) दुपारी घडली. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शाळेची सहल १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाचगणी-महाबळेश्वर येथे गेली होती. या सहलीदरम्यान आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात काही विद्यार्थिनी नृत्य करत होत्या. त्यावेळी नववीतील एका विद्यार्थ्याने या नृत्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करून इन्स्टाग्रामवर प्रसारित केला होता.
या व्हिडिओवरून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला. इतर विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला हा व्हिडिओ समाजमाध्यमावरून हटवावा लागला होता. याच घटनेचा राग मनात धरून त्याने विद्यार्थिनीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास संबंधित विद्यार्थ्याने वर्गामध्येच विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आणि छातीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर रक्तबंबाळ अवस्थेतील विद्यार्थिनीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. जखमी विद्यार्थिनीचा जबाब नोंदविण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेबाबत शाळा प्रशासनाने दुःख व्यक्त केले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, चौकशीत पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच, या प्रकारास जबाबदार असलेल्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकल्याचेही सांगण्यात आले.
भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारीचे उपाय राबविण्यात येत असून, सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांच्या दप्तरांची काटेकोर तपासणी सुरू करण्यात आल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
समाजमाध्यमांवरील व्हिडिओ आणि त्यातून निर्माण होणारे वाद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर ठरत असल्याने, या घटनेनंतर शाळा प्रशासन आणि पालकांसमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



