सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर l अक्षय इथापे
बारामती : नीरा-बारामती राज्यमार्गावर सोरटेवाडी गावच्या हद्दीत पवार वस्ती बसस्टॉपजवळ भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या अपघातात विकास सिताराम जगताप (वय ५४, रा. साळोबा वस्ती, मुरूम, ता. बारामती) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री सुमारे ८.४६ वाजण्याच्या सुमारास विकास जगताप हे सोरटेवाडी गावच्या हद्दीतील पवार वस्ती बसस्टॉपजवळ नीरा-बारामती राज्यमार्गावरून पायी जात होते. त्यावेळी करंजेपूल चौकाकडून वडगाव निंबाळकरच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.
या अपघातात जगताप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच शरीराच्या इतर भागांनाही दुखापती झाल्या. त्यांना तातडीने वाघळवाडी येथील साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री ९.५८ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वारुळे करीत आहेत.



