सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरुम (ता. बारामती) : दिवाळी सणाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरुम येथे विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कल्पकतेतून विविध रंगांचे आकर्षक आकाशकंदील तयार केले.
या कार्यशाळेदरम्यान शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना रंगीत कागदांचा वापर करून आकर्षक व पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने विविध आकारांचे आणि नक्षीदार आकाशकंदील तयार केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला असून त्यांच्यातील सर्जनशीलता, कल्पकता आणि हस्तकलेची आवड विकसित होण्यास मदत झाली. स्वतः तयार केलेले आकाशकंदील हातात धरून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेच्या या उपक्रमाचे पालक वर्गातूनही कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सणाचा आनंद द्विगुणित होण्याबरोबरच त्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळत आहे.



