Rajgad News l पाबे घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळली; तिघे सुदैवाने बचावले!


सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 

राजगड : मिनल कांबळे 

तोरणा किल्ल्याकडे पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कारचा पाबे घाटात भीषण अपघात झाला. घाट चढताना अचानक बंद पडलेली कार पावसामुळे ओलसर झालेल्या रस्त्यावरून मागे घसरत तब्बल दीडशे फूट खोल दरीत कोसळली. शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या भीषण अपघातात कारमधील तिघे जण सुदैवाने बचावले असून मोठी दुर्घटना टळली.


मिळालेल्या माहितीनुसार, मोनीस अरविंद चाबडीया, रितिका सिंग आणि उमेश बगाडे (सर्व रा. पुणे) हे हडपसर येथून कारने तोरणा किल्ल्याकडे निघाले होते. पाबे घाट चढत असताना त्यांची कार अचानक बंद पडली. कार पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पावसामुळे रस्ता ओलसर असल्याने कार मागच्या दिशेने घसरू लागली. काही क्षणांतच चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळली.


अपघाताची घटना लक्षात येताच मागून येणाऱ्या पर्यटकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच या पर्यटकांनी दोरीच्या साहाय्याने कारमधील तिघांना दरीतून सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर तानाजी भोसले, त्याने सपकाळ, संदीप सोळसकर, दिलीप तळेकर यांच्या रेस्क्यू टीमसह शिक्षक दत्तात्रय कळबे यांनीही बचावकार्यात मदत केली.


अपघातातील तिघांना पुढील उपचारासाठी वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे शहरात पाठविण्यात आले.


दरम्यान, पर्यटक आणि रेस्क्यू टीमने दाखवलेल्या तत्परतेमुळे दरीत कोसळलेल्या कारमधील तिघांचे प्राण वाचले. या घटनेमुळे पाबे घाटातील प्रवासादरम्यान वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

To Top