Jawali News l मेढा तहसील कार्यालयातील झेंडावंदन चौथऱ्याची तोडफोड; शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!


सोमेश्वर रिपोर्टर टीम----

मेढा | सोमनाथ साखरे 

मेढा येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील झेंडावंदन चौथऱ्याची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चौथऱ्यावरील स्टीलचे ग्रील उखडण्यात आले असून, ग्रॅनाइटचेही नुकसान झाले आहे. महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाच्या आवारातील या प्रकारामुळे प्रशासनाच्या देखरेखीबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.


तहसील कार्यालयाच्या आवारात रात्रीच्या वेळी काही व्यक्तींकडून मद्यपान केले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. मद्यपानानंतर रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि कचरा परिसरात टाकला जात असल्याने कार्यालयाच्या आवारातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि परिसरातील अस्वच्छता यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या वेळी याच चौथऱ्यावर शासकीय इतमामात ध्वजारोहण केले जाते. अशा महत्त्वाच्या ठिकाणाची झालेली दुरवस्था पाहता नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. चौथऱ्यावरील स्टीलचे ग्रील उखडणे आणि ग्रॅनाइटचे नुकसान होणे ही केवळ मालमत्तेच्या नुकसानीची बाब नसून, सार्वजनिक मालमत्तेच्या देखभालीचा आणि सुरक्षेचाही प्रश्न आहे.


या नुकसानीमागील नेमके कारण काय, हा प्रकार कोणी केला आणि तहसील कार्यालयाच्या आवारात रात्रीच्या वेळी असे प्रकार कसे घडतात, याची चौकशी होणे आवश्यक आहे. परिसराची नियमित पाहणी करणे, आवश्यकतेनुसार सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे, तसेच रात्रीच्या वेळी होणाऱ्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याशिवाय परिसरात पडलेल्या दारूच्या बाटल्या आणि कचरा तातडीने हटवून स्वच्छता राखण्याची गरजही व्यक्त होत आहे.


दरम्यान, याप्रकरणी जावलीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आता प्रशासन या प्रकाराची किती गांभीर्याने दखल घेते आणि शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

To Top