सोमेश्वर रिपोर्टर टीम----
माळेगाव l प्रतिनिधी
शेतातील मातीचा भराव सुरू ठेवण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनपाल जहीर सिराज शेख (वय ४७) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. माळेगाव येथील आयटीआयसमोरील हॉटेल शिवकृपा येथे ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त तक्रारीनुसार, तक्रारदाराची कोऱ्हाळे खुर्द येथे चार हेक्टर शेतजमीन आहे. पावसामुळे शेतातील माती नीरा नदीत वाहून गेल्याने तक्रारदार नदीपात्रातील माती शेतात टाकत होते. त्यावेळी २६ सप्टेंबर २०२६ रोजी वनपाल जहीर शेख यांनी हे काम थांबवून संबंधित जागा वनविभागाच्या मालकीची असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. तसेच कारवाईची भीती दाखवून काम सुरू ठेवण्यासाठी स्वतःसाठी आणि त्यांच्या सहकारी भूमरे मॅडम यांच्यासाठी एकूण १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यापैकी चार हजार रुपये त्याच दिवशी स्वीकारल्याचा आरोप असून, उर्वरित सहा हजार रुपये दिल्याशिवाय काम सुरू करू नये, असे सांगितल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने २३ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागणीची पडताळणी केली. या वेळी पंचांसमक्ष वनपाल जहीर शेख यांनी यापूर्वी चार हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित सहा हजार रुपयांची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी माळेगाव येथे सापळा रचण्यात आला. हॉटेल शिवकृपा येथे तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी जहीर शेख यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये माळेगाव पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीत नमूद आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. या प्रकरणाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करत आहेत.
नागरिकांना आव्हान-
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.




