सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सातारा l प्रतिनिधी
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरळे, वडूथ, शिवथर आणि परिसरातील गावांमध्ये महावितरणच्या विद्युत रोहित्रांची (डीपी) चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. आरळे येथील शेतशिवारात गेल्या चार महिन्यांत चार वेळा डीपी चोरीच्या घटना घडल्या असून, वडूथ आणि शिवथर परिसरातही अशा प्रकारच्या चोऱ्या झाल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून, पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शेतकरी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी मोठा खर्च करून पिके उभी करतात. मात्र, शेतातील विद्युत रोहित्र चोरीला गेल्याने वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी, पिकांना वेळेवर पाणी देण्यात अडचणी निर्माण होतात. आधीच शेतीचा वाढता खर्च आणि पिकांच्या उत्पादनाची अनिश्चितता यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर डीपी चोरीच्या घटनांमुळे नवे संकट उभे राहिले आहे.
या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चार एफआयआर दाखल झाल्याची माहिती आहे. मात्र, गुन्ह्यांच्या तपासात किती प्रगती झाली, संशयितांची चौकशी करण्यात आली का, चोरीला गेलेले साहित्य हस्तगत झाले का आणि आरोपींना अटक झाली का, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
वारंवार होणाऱ्या डीपी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती द्यावी, चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.




