बारामती l गायरान जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी मुरूम ग्रामपंचायत सरपंच अपात्र; अपर जिल्हाधिकारी यांचा आदेश

सोमेश्वर रिपोर्टर live

सीमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर; प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भातील प्रकरणात अपर जिल्हाधिकारी, पुणे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, मुरूम ग्रामपंचायतीचे सरपंच संजयकुमार नामदेव शिंगटे यांना ग्रामपंचायत सदस्यपदी व सरपंचपदी राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. सदर आदेश दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पारित करण्यात आला आहे.
      
या प्रकरणात मुरूम ग्रामपंचायत सदस्य प्रशिल प्रकाश जगताप व संकेत दिलीप जगताप यांनी अपात्रतेसंदर्भात अर्ज दाखल केला होता. मुरूम येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करून संबंधित कागदपत्रे व प्रशासकीय अभिलेखांच्या आधारे कायदेशीर कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात अर्जदार यांच्या वतीने ॲड.जे.पी. धायतडक यांनी बाजू मांडली तर जाब देणार यांच्या वतीने ॲड.ए.व्ही. प्रभुणे यांनी बाजू मांडली.

सदर प्रकरणात तहसीलदार, बारामती यांच्या अहवालासह उपअधीक्षक भूमिअभिलेख, बारामती यांच्या मोजणी अहवालाचा व वस्तुस्थितीदर्शक नकाशाचा संदर्भ विचारात घेण्यात आला. निकालपत्रात गट क्रमांक ३८ व १२७ मधील गायरान जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भातील नोंदींचा उल्लेख आहे. तसेच तलाठी नमुना १ ई मधील नोंदी आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचाही विचार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १४(१)(ज-३) अन्वये अपात्रतेच्या मुद्द्याचे परीक्षण करून अपर जिल्हाधिकारी, पुणे यांनी मुरूम ग्रामपंचायत सदस्यपदी व सरपंचपदी अपात्र ठरविण्याचा आदेश दिला. निकालपत्रात संबंधित न्यायालयीन निर्णयांचा व अतिक्रमणासंदर्भातील कायदेशीर तत्त्वांचाही विचार करण्यात आला आहे.

तक्रारदार मुरूम ग्रामपंचायत सदस्य  प्रशिल प्रकाश जगताप व  संकेत दिलीप जगताप यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सक्षम प्राधिकरणाने निर्णय दिल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
---------
सदर प्रकरणी निकाल हा राजकीय दबावापोटी देण्यात आला आहे. मी कोणत्याही अपात्रतेचे कृत्य केलेले नाही. सदरील आदेशावर उच्च न्यायालयात दाद मागणार
संजयकुमार शिंगटे
सरपंच-मुरूम
To Top