सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे ; दिपक जाधव
बारामती तालुक्यातील बाबुर्डी अंतर्गत शेरीचीवाडी येथे दोन वृद्ध महिलांची धारदार हत्याराने हत्या करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याच्या खळबळजनक घटनेचा पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणातील आरोपी विकास उर्फ अप्पा राजेंद्र लडकत (वय २५, रा. शेरीचीवाडी, ता. बारामती) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरी केलेले सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गणेश मारुती लडकत (वय ४५, रा. शेरीचीवाडी, सध्या रा. तांदुळवाडी रोड, बारामती) यांनी सुपे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी यांच्या आई इंदुमती मारुती लडकत (वय ७५) व चुलत वहिनी कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ५५) या दोघी घरासमोरील ओट्यावर झोपलेल्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावरील सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर धारदार हत्याराने त्यांच्या मानेवर व गळ्यावर गंभीर वार करून दोघींची हत्या करण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सुपे, दौंड, बारामती शहर व बारामती तालुका पोलीस ठाण्यांची पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली.
या तपासासाठी १० अधिकारी व ५० पोलीस अंमलदारांची आठ पथके तयार करण्यात आली. घटनास्थळासह पंचक्रोशीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयितांची अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, कोल्हापूर आणि निपाणी (कर्नाटक) या भागांत जाऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांनी २०० हून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली.
दरम्यान, तपास पथकाला शेरीचीवाडीतीलच विकास लडकत याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने दोन्ही महिलांची हत्या करून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुपे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके तसेच बारामती शहर, बारामती तालुका, दौंड व सुपे पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
.........................
