सोमेश्वर रिपोर्टर टीम----
साखरवाडी : गणेश पवार
फलटण-लोणंद पालखी महामार्गावर निंभोरे गावच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,सुवर्णदीप सुरेश जगताप (वय २०, रा. रांझे ता भोर जि पुणे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे तर त्याच्यासोबत असलेला मित्र रोहित रवींद्र घोगरे रा रांझे ता भोर जि पुणे हा जखमी झाला आहे. ही घटना रविवार दि. २५ ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णदीप सुरेश जगताप आणि त्याचा मित्र रोहित रवींद्र घोगरे हे दोघे स्प्लेंडर (क्रमांक MH12 DN 0822) विडणी येथून रांझे, ता. भोर, जि. पुणे या आपल्या गावाकडे जात होते. याचवेळी फलटण लोणंद पालखी महामार्गावर निंभोरे गावच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोर उसाने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक MH 16 CQ 9736 आणि दुचाकीचा अपघात झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर तेथेच सोडून पळून गेला. या अपघातात दुचाकीवरील सुवर्णदीप जगताप याच्या पायावरून ट्रॅक्टर गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्यांच्यासोबत असलेले रोहित घोगरे हा देखील जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महादेव पिसे आणि अमोल पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी सुवर्णदीप जगताप यांना बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. जखमी रोहित घोगरे याच्यावर खेड-शिवापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातप्रकरणी मयत सुवर्णदीप जगताप यांचे मावसभाऊ ऋषिकेश अनंता जगताप (रा. विडणी) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.
चौकट
अडीच महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
जगताप यांच्या कुटुंबावर नियतीने मोठा आघात केला आहे. अवघ्या अडीच महिन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर आता तरुण सुवर्णदीप यांचाही अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या आई आणि बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील तरुण आधार हरपल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून, भरधाव वाहतूक, उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची महामार्गावरील वर्दळ आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.



