Pune Accident l भीमाशंकर-मंचर मार्गावरील पोखरी घाटात इको गाडी दरीत कोसळली; चालकासह दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी


सोमेश्वर रिपोर्टर टीम----

भीमाशंकर ; प्रतिनिधी

भीमाशंकर-मंचर मार्गावरील पोखरी घाटात इको गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली आणि तिने अनेक पलट्या घेतल्या. या दुर्घटनेत गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४/केडब्ल्यू २०९१ क्रमांकाची इको गाडी घोडेगाव येथून भीमाशंकरच्या दिशेने जात होती. या गाडीत आदिवासी भागातील स्थानिक नागरिक प्रवास करत होते. डिंभे येथील गोरक्ष राक्षे यांच्या मालकीची ही गाडी ज्ञानेश्वर गोविंद गवारी (वय ४१, रा. ढगेवाडी) चालवत होते. पोखरी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट खोल दरीत कोसळली.


या भीषण अपघातात चालक ज्ञानेश्वर गवारी आणि अंदाजे ७० वर्षांच्या एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. मृत महिला स्थानिक रहिवासी असल्याची माहिती असून, तिची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.


अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनीही कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला.


जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालय आणि घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर काही जखमींना पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात, तर काहींना मंचर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.


या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोखरी घाटातील या दुर्घटनेने पुन्हा एकदा घाटमार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

To Top