सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती l प्रतिनिधी
बारामती, दि. २९ : शिरसाई उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन तातडीने सुरू करावे आणि लाभक्षेत्रातील सर्व १५ गावांना समान व न्याय्य पाणीवाटप करावे, या मागणीसाठी उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी तळावर गुरुवारी (दि. २९) सकाळी दहा वाजता बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आले. या आंदोलनात योजनेच्या लाभक्षेत्रातील १५ गावांतील पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे उंडवडी कडेपठार, बऱ्हाणपूर आणि गोजुबावी ही गावे सिंचनापासून वंचित राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आता रब्बी हंगाम सुरू झाल्याने पिकांना पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी खडकवासला कालव्यातून शिर्सुफळ तलावात पाणी सोडून शिरसाई उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
आंदोलन सुरू होताच लाभक्षेत्रातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. पाणीवाटपाचे ठोस नियोजन आणि पाटबंधारे विभागाकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांच्या सहा प्रमुख मागण्या
शिरसाई योजनेचे रब्बी आवर्तन तातडीने सुरू करावे, लाभक्षेत्रातील सर्व १५ गावांना समान व न्याय्य पाणीवाटप करावे, शिर्सुफळ तलावातील पाण्याची निर्धारित पातळी आणि स्थानिक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाण्याबाबत पाटबंधारे विभागाने लेखी माहिती द्यावी, योजनेसाठी तलावात स्वतंत्र बांध उभारावा, पाण्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी गेज मीटर बसवावे, तसेच मुख्य पंपगृह आणि तलाव परिसरात पारदर्शकता व सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सहा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.
“पाणी आमच्या हक्काचे आहे. रब्बी आवर्तनाचे ठोस नियोजन आणि लेखी आश्वासन मिळेपर्यंत १५ गावांच्या वतीने बेमुदत चक्री उपोषण सुरूच राहील,” असा निर्धार छत्रपती पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सतीश गोलांडे यांनी व्यक्त केला.
शिरसाई योजनेच्या पाणीवाटपाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रब्बी हंगामात पिकांना पाणी मिळण्यासाठी सुरू झालेल्या या आंदोलनावर पाटबंधारे विभाग काय भूमिका घेतो, याकडे आता लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



