सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे | प्रतिनिधी
ओडिशातून १२ किलो गांजा घेऊन जात असताना पुणे शहर पोलिस दलातील एका कॉन्स्टेबलला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. नितीन ज्ञानू शिंदे असे अटक करण्यात आलेल्या कॉन्स्टेबलचे नाव असून, तो पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागातील विश्रामबाग वाहतूक विभागात गेल्या दीड वर्षापासून कार्यरत होता. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला तातडीने निलंबित केले आहे. तसेच त्याला सेवेतून बडतर्फ करण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही सुरू असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील पोलिसांना एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती मिळाली होती. संबंधित व्यक्ती बसथांब्यावर गांजा घेऊन थांबल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन तपासणी केली. यावेळी नितीन शिंदे याच्या बॅगेची झडती घेतली असता, त्यामध्ये १२ किलो गांजा आढळून आला.
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत तो पुणे शहर पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, या घटनेच्या वेळी त्याने वैद्यकीय रजा घेतली असल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील नेक्कोंडा पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस दलातील कर्मचाऱ्यालाच गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पुढील तपास तेलंगणा पोलिसांकडून सुरू आहे.




