Rajgad Crime l जुन्या भांडणातून ४७ वर्षीय व्यक्तीवर गोळीबार; आठ तासात आरोपी जेरबंद : वेल्हे पोलिसांची कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राजगड : मिनल कांबळे                    
वेल्हे-नसरापूर रस्त्यावरील कातुर्डेवाडी जवळ जुन्या भांडणाच्या वादातून ४७ वर्षीय व्यक्तीवर गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला वेल्हे पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक केली. ओंकार बाळू जाधव (रा. मालवली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, या गोळीबारात विजय मारुती वसवे (वय ४७, रा. मालवली) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (१३ ऑक्टोबर) सायंकाळी ६.३० वा. घडली.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या वादातून आरोपी ओंकार जाधव याने त्यांच्या पाठीमागून येत गोळीबार केला. या हल्ल्यात वसवे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), शस्त्र अधिनियम कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या विजय वसवे यांना वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे शस्त्रक्रिया करून त्यांच्या पाठीमध्ये लागलेली गोळी काढण्यात आली.
दरम्यान, गुन्हा घडवून आरोपी फरार झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी वेल्हे पोलिसांनी तपास पथके तयार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. या तपासाच्या आधारे बुधवारी (१४ ऑक्टोबर) अवघ्या आठ तासांत ओंकार जाधव याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि हवेली विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते, पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, पोलीस हवालदार ज्ञानदीप धिवार, सोमेश राऊत, अजय शिंदे, आकाश पाटील, राजेंद्र आवदे, शुभम कदम आणि अजय गार्डी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
To Top