सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे विभागीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेत समर्थ ज्ञानपीठ संचलित सह्याद्री पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विविध योगासन प्रकारांत विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला. विशेष म्हणजे, प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत समर्थ सुरेश पाटील (इयत्ता सातवी) याने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्टिस्टिक पेअर आणि रिदमिक पेअर या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कार्तिक मोहन सूळ (इयत्ता सहावी) यानेही याच वयोगटात दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी सुवर्ण कामगिरी केली. या दोन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पूर्णिमा मोहन सूळ (इयत्ता सहावी) हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात ट्रेडिशनल योगासन प्रकारात द्वितीय, तर आर्टिस्टिक सिंगल प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला. मोहित मंगेश वरठा (इयत्ता आठवी) याने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्टिस्टिक सिंगल प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. प्रथमेश सुनील वायेडा (इयत्ता नववी) याने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्टिस्टिक सिंगल आणि रिदमिक पेअर या दोन्ही प्रकारांत तृतीय क्रमांक मिळवला. तर धीरज सुरेश गिंभल (इयत्ता नववी) याने रिदमिक पेअर प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे योगासन प्रशिक्षक मंडले सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य हनुमंतराव सावंत, विश्वस्त चैतन्य सावंत व रोहिणी सावंत तसेच शाळेचे प्राचार्य अजित अर्जुनराव वाघमारे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षक मंडले सरांचे अभिनंदन केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
विभागीय स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे सह्याद्री पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




