Baramati News l विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न सुटला; कुतवळवाडी-बोरकरवाडीसाठी एसटी बससेवा सुरू!


सोमेश्वर रिपोटर टीम——

सुपे, : दीपक जाधव 

बारामती तालुक्यातील कुतवळवाडी, बोरकरवाडीसह परिसरातील विद्यार्थ्यांची अनेक वर्षांपासूनची वाहतुकीची गैरसोय अखेर दूर झाली आहे. कुतवळवाडी-बोरकरवाडी फाटा ते सुपे अशी एसटी बससेवा सुरू करण्यात आली असून, बोरकरवाडी येथे ग्रामस्थांनी बसचे उत्साहात स्वागत केले.

खंडूखैरेवाडी, भोंडवेवाडी, कुतवळवाडी आणि बोरकरवाडी येथील विद्यार्थ्यांना सुपे येथील शाळांमध्ये जाण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे संचालक राजेंद्र बोरकर यांनी दिली.

नवीन बससेवेचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता मुर्टी येथून बस सुटून मोरगाव, खंडूखैरेवाडी, भोंडवेवाडी, कुतवळवाडी आणि बोरकरवाडी फाटामार्गे सकाळी ११.३० वाजता सुपे येथे पोहोचणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता सुपे येथून परतीचा प्रवास सुरू करून याच मार्गाने बस मुर्टी येथे जाणार आहे.

या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे सोयीचे होणार असून, परिसरातील नागरिक आणि अन्य प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. बससेवा सुरू करण्यासाठी कुतवळवाडीच्या सरपंच रूपाली भोसले, उपसरपंच दीपाली बोरकर, भाऊसाहेब भोसले यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

To Top