सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर; प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या परिसरात वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरणने आठ जणांविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. वीजचोरी आढळून आल्यानंतर संबंधित ग्राहकांना तडजोड रक्कम तसेच वीजचोरीचे देयक भरण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, संबंधितांनी ही रक्कम न भरल्याने अखेर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (दि. २० नोव्हेंबर २०२६) ही कारवाई करण्यात आली. महावितरणने संबंधितांकडे केलेल्या कारवाईनुसार, वीजचोरीप्रकरणी तडजोड रक्कम आणि वीजचोरीचे देयक भरणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित आठ जणांनी ही रक्कम भरली नसल्याने महावितरणच्या वतीने विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कायदेशीर फिर्याद देण्यात आली.
या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुरनं. २७३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार देवकर यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार शेगर करीत आहेत-------
वीजचोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होत असून, त्याचा अप्रत्यक्ष भार नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवरही पडतो. त्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणने कठोर भूमिका घेतली असून, वीज वापरासाठी अधिकृत जोडणी घेणे आणि नियमित बिल भरणे आवश्यक आहे.
अरविंद अंभोरे
उपकार्यकारी अभियंता, सोमेश्वर उपविभाग





