सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील घोरेपडळ सांगवी येथे गावचे पोलीस पाटील अशोक येनपुरे यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) सायंकाळी समोर आली आहे. शेतात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशोक येनपुरे यांच्या डोक्यावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे आढळून आले आहे.
घटनेनंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस पाटलांच्या हत्येमागील नेमके कारण काय, तसेच या घटनेत कोणाचा सहभाग आहे, याचा तपास राजगड पोलीस करत आहेत. या घटनेमुळे घोरेपडळ सांगवी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





