Pune News l ‘दादांचा प्रवास अर्धवट; स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू!’ सुनेत्रा पवार भावुक; अमित शाहांच्या हस्ते अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण


सोमेश्वर रिपोटर टीम——

पुणे : प्रतिनिधी 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या. ‘दादांचा प्रवास अर्धवट राहिला असेल; पण त्यांच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू,’ असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. अजित पवार यांच्या कार्याचा आणि आठवणींचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. दुःखाने खचून न बसता आदरणीय दादांच्या अपूर्ण स्वप्नांची जबाबदारी घेऊन मी आपल्यासमोर उभी आहे. त्यामुळे मी खचणार नाही आणि मागे तर बिलकूलच पाहणार नाही,’ असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

काही माणसांच्या जाण्याने एक घर रिकामे होते, तर काही माणसांच्या जाण्याने संपूर्ण काळ पोरका होतो. दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले. अजितदादांची शिस्त, त्यांचे विचार आणि विकासासाठीची तळमळ प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हीच खरी श्रद्धांजली!

अजित पवार यांच्या विकासकामांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले. शेतकरी हा अजितदादांच्या कामाचा केंद्रबिंदू होता. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देणे आणि त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे, हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्या म्हणाल्या.


पुणे जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने करण्याचा, जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आणि अजित पवार यांनी सुरू केलेली विकासाची वाट पुढे नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


अजितदादांच्या आठवणींनी भावुक झालेल्या सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणातून दुःखावर मात करत विकासाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या भावनिक भाषणाने उपस्थितांची मने हेलावली.

Tags
To Top