सोमेश्वर रिपोटर टीम——
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील पळसोशी-पाले परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या थेट मुख्य रस्त्यावर तसेच शेती परिसरात नागरिकांच्या निदर्शनास येत असल्याने शेतकरी आणि वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वारंवार माहिती देऊनही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पळसोशी, पाले, आंबाडे, नेरे, धावडी आणि बाजारवाडी परिसरात मागील दोन महिन्यांत आठ ते दहा वेळा बिबट्याचे दर्शन झाले आहे. विशेष म्हणजे, बिबट्या दिवसा देखील नागरिकांच्या नजरेस पडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी शेतात जाणे तसेच सायंकाळपर्यंत शेतीची कामे करणे टाळण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि. २४) पळसोशी-पाले मार्गावर डोंगर परिसरातून अचानक बिबट्या रस्त्यावर आला. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, काही सेकंदांतच बिबट्याने रस्ता ओलांडून जंगलाच्या दिशेने धाव घेतल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बिबट्याचा वावर सातत्याने वाढत असल्याने भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने या परिसरात तातडीने पाहणी करून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.




