सोमेश्वर रिपोटर टीम—-
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भरदिवसा एका तरुणाची गोळीबार आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मंदार मारुती किवळे (वय ३५) या तरुणावर पाच ते सात जणांनी त्याच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली असून न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, मंदार किवळे याची अवघ्या चार दिवसांपूर्वीच एका खून प्रकरणात जामिनावर सुटका झाली होती. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या या हत्येचा संबंध जुन्या वैमनस्याशी आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. कात्रज येथील संतोषनगर परिसरात जागेच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण या तरुणाचा निर्घृण खून झाला होता. या प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगार अमर दिलीप साकोरे (वय ४०), मंदार मारुती किवळे (वय ३५), गिरीश सुभाष बाबरे (वय २५) आणि योगेश बाबुराव ढोरे (वय ३५) या चौघांना अटक केली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम चव्हाण आणि अमर साकोरे यांच्यात जागेवरून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी पहाटे शुभम संतोषनगर परिसरातून जात असताना अमर साकोरे, मंदार किवळे आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला अडवून शिवीगाळ व मारहाण केली होती.
आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी शुभमने पळ काढला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करून बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता.
या घटनेनंतर आंबेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कामठी बुद्रुक येथे छापा टाकून मंदार किवळेसह चौघांना अटक केली होती. याच प्रकरणात मंदारला जामीन मिळाला होता. मात्र, सुटकेनंतर अवघ्या चार दिवसांतच त्याची न्यायालयाबाहेर हत्या झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या हत्येमागे जुन्या खून प्रकरणातील वैमनस्य किंवा बदल्याची भावना आहे का, या दिशेने पोलिस तपास करत आहेत. पुणे पोलिसांनी दोन संशयित आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत. भरदिवसा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घडलेल्या या घटनेमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.



