Pune Breaking | शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील हल्ल्याची सुनेत्रा पवारांकडून गंभीर दखल; दोषींना पाठीशी घालणार नाही!


सोमेश्वर रिपोटर टीम—-

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील गजबजलेल्या शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दखल घेतली असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा कडक इशारा दिला आहे. पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “शिवाजीनगर न्यायालयाबाहेर घडलेली गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही.”

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला अधिक सतर्क आणि कठोर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर करडी नजर आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कात्रज येथील संतोषनगर परिसरात झालेल्या खून प्रकरणातील आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर बुधवारी (दि. २५) दुपारी शिवाजीनगर न्यायालय परिसरात हल्ला करण्यात आला. न्यायालयातील चेंबर क्रमांक ६३ बाहेर, मेट्रो स्थानकाजवळ दुपारी सव्वा एकच्या सुमारास चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी दोन पिस्तुलांचा वापर करून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळ्या न सुटल्याने त्यांनी धारदार कोयत्याने मंदारवर सपासप वार केले.

या हल्ल्यात मंदार गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राचे अनेक वार असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन पिस्तुले जप्त केली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, २० एप्रिल २०२५ रोजी कात्रज येथील संतोषनगर परिसरात जमिनीच्या आणि आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण याचा खून झाला होता. या प्रकरणात मंदार किवळे आरोपी असून, चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. बुधवारी न्यायालयीन कामकाजासाठी तो न्यायालयात आला असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांची ओळख पटविण्यात आली असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. न्यायदानाच्या मंदिराबाहेरच घडलेल्या या थरारक घटनेमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

To Top